औरंगाबाद: शहराच्या नवलाईत भर घालणाऱ्या काही घटनांपैकी एक म्हणजे निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांचे इंग्लिश बोर्ड ! या बोर्डावरील अक्षर न अक्षर भिंगाचा चष्मा लावून शहरवासीय वाचत आहेत. यात आपल्या भल्याच काही लिहिलं आहे का ? हेच शोधण्याचा प्रयत्न तरुण करताना दिसतात.
निवडणुका आल्या की प्रचाराचे मोठे होर्डिंग शहरभर धडकतात. विरोधी पक्षांवर टीका करणारे, आपल्या जाहीरनाम्यात आश्वासन देणारे अन नेत्यांच्या फोटोचे होर्डिंग येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. होर्डिंग वाल्यांची सध्या जालना रोडवर स्पर्धा सुरू आहे. प्रत्येक उमेदवाराने जागा मिळेल तिथे मोठमोठे बोर्ड झळकावले आहेत. काही डिजिटल बोर्डही नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यातल्या त्यात अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव आणि वंचित आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी इंग्रजी भाषेत होर्डिंग्स लावले आहेत. इंग्रजी भाषेतील या फलकांनी जालना रोडवर ट्राफिक जाम होऊ लागलीये. या रोड वरील सगळे फलक मराठी अथवा हिंदी भाषेतील आहेत. फक्त या दोनच उमेदवारांनी अस्सल इंग्रजीत बोर्ड झळकवले. आता हे बोर्ड वाचण्यासाठी लोक भिंगाचा चष्मा घेऊन रस्त्यावरच उभे ठाकत आहेत. बोर्ड वाचण्याला वेळ लागत असल्याने याठिकाणी ट्राफिक जाम होऊ लागलीये. लोकांना या बोर्ड भारी कौतुक ! अनेकांना एक एक शब्द जोडून त्या शब्दाचा अर्थ समजण्यासाठी डिक्शनरी सोबत ठेवावी लागतेय. जाधवांनी कोणत्या विदेशी विद्यापीठातून शिक्षण घेतलं त्या विद्यापीठाचं नाव तरुणाई लिहून घेत आहे. या विद्यापीठात राजकारण तर शिकवल्या जात नाही ना याचा शोध तरुण पिढी इंटरनेटवर घेते आहे. त्यासाठी लागणारा खर्च याचाही शोध घेण्यात अनेकांचा दिवस वाया जातोय. दादाचा आदर्श घेऊन आपणही असंच एखादं बॅनर शहरात झळकावूच अशी प्रतिज्ञा अनेकांनी घेतली. दुसरे उच्चशिक्षित उमेदवार जलील यांनी इंग्रजीतून आपण केलेल्या कामाची जंत्री मतदारांसमोर ठेवली. त्यांनी ही जंत्री कॉलेज कॅम्पस मध्ये लावली असती तर बरे झाले असते. किमान वाचक वर्ग तरी वाढला असता. मात्र जालना रोड वरून धावत्या लोकांना इंग्रजीतला बोर्ड वाचण्यासाठी उगच घुटमळत थांबावे लागते. क्षणार्धात वाचून होणारा हा बोर्ड नाही. त्यामुळे उगीच ट्राफिक कंट्रोल करता करता पोलिसांची दमछाक होऊ लागली आहे.
शिक्षणाची माती की मातीच शिक्षण !
आता या उच्चशिक्षित उमेदवारांवर लोक टीका करू लागलेत. विदेशी विद्यापीठात जाऊन शिक्षणाची माती करण्यापेक्षा आम्ही मातीतलं शिक्षण घेऊन याच मातीसाठी काम करू असंही बोलताहेत. शहराची साक्षरता जजेमतेम 60- 65 टक्के ! इथं मराठीच वाचण्याचे वांधे तिथे इंग्रजी बोर्डची डोकेदुखी कशाला असही बोलू लागलेत. मात्र, या उमेदवारांना सांगावे तरी कोणी ! आपल्या शिक्षणाचा गवगवा करताना कमी शिकलेले आदर्श राजकारणी ते विसरलेत. तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव जेव्हा ऑक्सफर्ड विद्यापीठात भाषण ठोकतात. तेव्हा आपले पाचही बोटं घशात गेल्या शिवाय राहत नाहीत. अनेक अल्पशिक्षित आणि योग्य व्यक्ती शिक्षणमंत्री झाल्याची उदाहरणे आहेत. म्हणूनच "इट हॅपन्स ओन्ली इन इंडिया" म्हणतात.औरंगाबाद ही त्यातलीच ! इथं मातीशी नातं अन विदेशी शिक्षणाचं पोतं घेऊन फिरणारे असंख्य आहेत. त्यांनी ते नातं जपलंय. उगीच आपल्या शिक्षणात महात्म्य सांगून जनतेशी नातं तोडलं नाही.